क्राईम न्युज

गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; 74.97 कोटींचा मुद्देमाल जप्त

गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; 74.97 कोटींचा मुद्देमाल जप्त

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

मुंबईतील साकीनाका पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील राजपीपळा तालुक्यात सुरू असलेल्या मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाच्या बेकायदेशीर निर्मिती कारखान्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तपासादरम्यान सुमारे 74.97 कोटी रुपयांचा अमली पदार्थ, रसायने व उत्पादन साहित्य जप्त करण्यात आले आहे. साकीनाका परिसरात एमडी विक्रीसाठी आलेल्या एका महिलेला 21 मे रोजी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वजुल कमर अब्दुल वफा चौधरी उर्फ पप्पू याचा या रॅकेटशी संबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढवली. तपासात गुजरातमधील एका घरात एमडी तयार केला जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तत्काळ गुजरातमध्ये छापा टाकून संपूर्ण कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत 20.040 किलो लिक्विड एमडी, एमडी निर्मितीसाठी वापरली जाणारी विविध रसायने, फ्लास्क, स्टिरर मशीन, कमर्शियल फ्रीज तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार केवळ जप्त एमडीची किंमत 74.46 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय लाखो रुपयांची रसायने आणि उत्पादन उपकरणेही जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे मुंबई आणि गुजरातदरम्यान कार्यरत असलेल्या अमली पदार्थांच्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणातील इतर आरोपी व आर्थिक साखळीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. अमली पदार्थांच्या विरोधात साकीनाका पोलिसांनी केलेली ही आतापर्यंतची मोठी कारवाई मानली जात असून यामुळे युवकांपर्यंत पोहोचणाऱ्या घातक ड्रग्जच्या पुरवठ्याला मोठा आळा बसणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये