परळीत धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लग्नासाठी दबाव
परळीत धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लग्नासाठी दबाव
बीड: बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला त्रास देत तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकल्याचा आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पीडित मुलीने धाडस दाखवत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी घरातील कामासाठी बाहेर गेली असताना आरोपी कृष्णा बाबुराव शिंदे याने तिचा पाठलाग केला. संधी साधून त्याने मुलीला रस्त्यात अडवले आणि तिच्यासोबत गैरवर्तन केले. या घटनेनंतर आरोपी सातत्याने मुलीच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होता. याच काळात आरोपीने आपल्यासोबत पळून जाऊन लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. “आपण दोघे पळून जाऊन लग्न करू, तू पळून जाण्यासाठी तयार राहा,” असे तो पीडितेला म्हणाला. मात्र मुलीने त्याच्या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. नकार मिळाल्यानंतर आरोपीने पीडितेला धमकी देण्यास सुरुवात केली. “माझ्याकडे तुझे फोटो आहेत. तू माझ्यासोबत आली नाहीस तर ते सोशल मिडियावर टाकेन,” अशी धमकी आरोपीकडून दिली जात होती. या प्रकारामुळे मुलगी मानसिक तणावाखाली गेली. सततचा त्रास आणि भीतीमुळे अखेर तिने संपूर्ण घटना आपल्या कुटुंबीयांना सांगितली.




